‘‘भारताचे हितसंबंध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचा रशिया पूर्ण आदर करतो,’’ असे प्रतिपादन रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे भारताशी किंवा इतर देशांसोबत असलेले द्विपक्षीय संबंध भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांचा निकष असू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चेच्या काही वेळ पूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने बोलताना लावरोव्ह म्हणाले, ‘‘भारत आणि रशिया यांच्यात विशेष धोरणात्मक भागीदारी आहे. भारत आणि अमेरिका किंवा भारत आणि इतर कोणत्याही देशामध्ये निर्माण झालेल्या द्विपक्षीय संबंधातील काही वादाच्या परिस्थितीला भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांचा निकष समजू शकत नाही.’’

रशियाकडून तेलखरेदी कमी करण्यासाठी अमेरिकेने विविध देशांवर दबाव आणल्यानंतरही भारताने रशियाच्या तेलाची आयात सुरूच ठेवल्यानंतर रशिया-भारत द्विपक्षीय संबंधांकडे आपण कसे पाहता, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर लावरोव्ह बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भारताच्या राष्ट्रीय हितांचा आम्हाला पूर्ण आदर आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचाही आम्ही आदर करतो.’’ चीनमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्या भेटीचा संदर्भही त्यांनी यावेळी दिला. पुतीन येत्या डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

https://agrowon.esakal.com/agro-special/russia-respects-indias-national-interests-and-modis-foreign-policy-lavrov-mj18

माहिती शेअर करा