केवळ अन्नसुरक्षा नव्हे तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेती क्षेत्र अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत जागतिक स्तरावर व्यापार आणि शुल्क (टॅरिफ) हे शस्त्रे बनली आहेत. अशा अस्थिरतेच्या भू-राजकीय परिस्थितीत देशहिताशी तडजोड केली जाणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी (ता. ९) सांगितले. जगातील बाजारपेठांवर अवलंबून न राहता आपल्याला देशांतर्गत अन्न सुरक्षा आणखी मजबूत करावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या १२० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री. चौहान बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की भारताचा जागतिक बंधुत्वावर विश्वास असून आम्हाला जगाची काळजी आहे. तरीदेखील देशहिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील. सध्याच्या अस्थिर भू-राजकीय परिस्थितीत देशांचा एकमेकांशी संघर्ष सुरू आहे. त्यासाठी व्यापार आणि शुल्कांचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे.