‘‘कृषी विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. तसेच नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा,’’ असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समृद्धी योजनेची आढावा बैठक गुरुवारी (ता. २५) पार पडली.या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, ‘पोकरा’ टप्पा-२ चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक वर्षा लड्डा, कृषी विभागाचे सर्व संचालक संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री. भरणे म्हणाले, की कृषी समृद्धी योजनेअंतर्गत दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. तर, पाच वर्षांत २५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या कृषी योजनांसाठी देण्यात येणार आहे.
अंमलबजावणीबाबत चर्चा
कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधिकरण करणे, मूल्यसाखळी बळकट करणे, हवामान अनुकूल व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच, योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश कृषिमंत्री भरणे यांनी दिले.