आर्थिक अडचणीत असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता शुक्रवारी (दि.२६ सप्टेंबर) पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी वितरीत करण्यात आला. २१ व्या हप्त्याची ५४० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम २७ लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील कृषी भवन येथून हा २१ वा हप्ता जारी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार या संकट काळात आपत्तीग्रस्त राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे; त्यांना पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण अंतर्गत घरे बांधून दिली जातील. मनरेगा अंतर्गत १५० दिवसांचा रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला जाईल. आपत्तीग्रस्त राज्यांतील लोकांना मी आश्वस्त करु इच्छितो की, केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. मुखतः पंजाबमधील महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ वा हप्ता आगाऊ स्वरुपात जारी केला आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/release-of-the-21st-installment-of-pm-kisan-samman-nidhi-ddb79

माहिती शेअर करा