मोदी सरकारने दसऱ्याच्या एक दिवस आधी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली. बुधवारी, पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यासाठी मंजुरी दिली. त्याचबरोबर, सरकारने कडधान्ये लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी दिली. ही तरतूद ६ वर्षांसाठी असेल. देशात कडधान्ये लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाला कडधान्ये क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी हा निधी वापरला जाईल.

देशात कडधान्ये उत्पादन वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशातील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याचा यामागील उद्देश आहे. या मोहिमेतर्गंत सरकार ११,४४० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे सुमारे २ कोटी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, साठवणूक सुविधा आणि शेतमालाच्या खरेदीची खात्री मिळणार आहे. सहा वर्षांच्या आराखड्यात कडधान्ये उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन, बियाणे प्रणाली, क्षेत्र वाढवणे, खरेदी आणि किंमत स्थिरतेसाठी एक व्यापक रणनीती अवलंबली जाईल. अधिक उत्पादन देणाऱ्या, कीड-प्रतिरोधक आणि हवामान-प्रतिरोधक कडधान्ये वाण विकसित करणे आणि त्याच्या विविध ठिकाणी चाचण्या घेण्यावर भर दिला जाणार आहे. प्रादेशिक अनुकूलतेची खात्री होण्यासाठी प्रमुख कडधान्ये उत्पादक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/union-cabinet-approves-six-year-plan-boost-pulses-production-in-india-ddb79

माहिती शेअर करा