शासनाने ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ दिल्यानंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी कायम असून, सर्व्हर डाऊनमुळे अॅपवर पिकांची नोंद करणे डोकेदुखी ठरत आहे. नोंदणी करताना फोटो अपलोड करण्यासाठी सॅटेलाइट चुकीचे क्षेत्र दाखवत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे नोंदणी कशी करायची याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दुसऱ्यांदा मुदत वाढवली असून तांत्रिक दुरुस्ती होणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शासनाने ई-पीक पाहणी अॅपवर खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र, सतत सर्व्हर डाऊन असल्याने आणि राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे शासनाने मुदतवाढ देत २१ सप्टेंबरपर्यंतची अंतिम तारीख दिली होती. दरम्यान, पीक नोंदणी करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देत अंतिम मुदत ३० सप्टेंबरअखेर दिली आहे.
दरम्यान, मुदतवाढ दिल्यानंतरही गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा सर्व्हरची समस्या निर्माण झाली आहे. सर्व्हर सुरू झाला तरी फोटो अपलोड होत नाहीत. याशिवाय, आता एक नवीन समस्या समोर आली आहे. शेतकरी जेव्हा आपल्या शेतातील गट नंबर आणि सर्व्हे नंबर टाकतात, तेव्हा अॅपवर सॅटेलाइट चुकीचे क्षेत्र दाखवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्की काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पिकाची नोंद कशी होणार, अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र पीक नोंद कमी झाली असल्याने मुदतवाढ मिळाली आहे. मात्र सातत्याने येणाऱ्या त्रुटी दुरुस्त होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/satellites-have-also-increased-farmers-headaches-rat16