पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत देशभरातील ३५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३ हजार ९०० कोटी रुपयांची थकित भरपाई सोमवारी (ता. ११) वितरित करण्यात आली. तसेच उर्वरित ७ हजार ५०० हजार कोटी रुपयांची रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
राजस्थान येथील झुंझुनू येथे पीकविमा योजनेची थकित भरपाई वितरणासाठी आयोजित कार्यक्रमात सोमवारी (ता. ११) ते बोलत होते. यामध्ये रब्बी २०२२, खरीप-रब्बी २०२४ मधील पीकविमा भरपाई वितरित करण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी थेट लाभ हस्तांतरणाच्या मदतीने कळ दाबून रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित केली. या वेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, कृषिमंत्री डॉ. किरोडी लाल मीना आदी उपस्थित होते.
कृषिमंत्री चौहान म्हणाले, की एका गावातील शेतकऱ्याचे नुकसान झाले तरीदेखील सरकार त्या संबंधित शेतकऱ्याला भरपाई देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांचे जीवन नैसर्गिक आपत्तींच्या संकटांपासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही कृषिमंत्र्यांनी केला.