खानदेशात सरळ किंवा देशी सुधारित, देशी संकरित कापूस वाणांची लागवड बऱ्यापैकी होते. परंतु हे वाण हवे तेवढे व हव्या त्या कंपनीकडून उपलब्ध होत नाही. त्यांचा यंदा तुटवडा भासणार नाही, यासंबंधी कार्यवाहीची मागणी केली जात आहे. खानदेशात छुप्या मार्गाने अवैध कापूस बियाणे दाखल होत आहे. कृषी विभाग कारवाई सत्र राबवीत आहे. परंतु अशातच सरळ वाणांची मागणी अधिक असते. हे वाण मात्र पुरेसे नसतात.

कापूस लागवडीत खानदेश अग्रेसर आहे. पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची सुमारे दोन लाख हेक्टरवर खानदेशात लागवड होते. तर एकूण लागवड क्षेत्र साडेआठ लाख हेक्टर एवढे असते. यात खानदेशात बेवडसाठी तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात देशी किंवा सरळ कापूस वाणांची लागवड केली जाते.

परंतु मागील तीन-चार वर्षे दर्जेदार व मुबलक प्रमाणात सरळ वाण उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. या वाणांसाठी शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातची वाट नाइलाजाने धरतात. यंदाही तशीच स्थिती असणार आहे. कारण यंदाही सरळ वाणांचा पुरवठा किती व कसा, केव्हा होईल, याचा कुठलाही आराखडा, नियोजन नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खानदेशात सुमारे ४० लाख कापूस बियाणे पाकिटांची कापूस लागवडीसाठी गरज आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यात २५ लाखांवर कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा अपेक्षित आहे. कापूस बियाण्याचा ९९ टक्क्यांवर पुरवठा खासगी कंपन्या, पुरवठादार करतात. या बियाण्यांसाठी खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते.

यात ९८ ते ९९ टक्के कापूस बियाणे बीटी (बोलगार्ड २) प्रकारातील असते. यात देशी कापूस बियाणे अल्प येते. त्यातही दर्जेदार सरळ किंवा देशी वाण उपलब्ध होत नाही. दोन वर्षांपूर्वी एका कंपनीने राज्यात किंवा खानदेशात आपले सरळ कापूस वाण उपलब्ध होणार नाही, बिजोत्पादन कार्यक्रमाचे नुकसान झाले होते, असे म्हटले होते.

यंदाही खानदेशात तीन ते चार लाख पाकिटे सरळ वाणांचा पुरवठा अपेक्षित आहे. परंतु पुरवठा होत नाही. काही कंपन्यांचे सरळ वाण जूनच्या मध्यात येतात. या वाणांची गरज बागायती पट्ट्यात असल्याने त्यांचा पुरवठा २० मेपर्यंत कृषी केंद्रांत व्हायला हवा, असाही मुद्दा आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/demand-for-straight-cotton-varieties-will-remain-high-rat16

माहिती शेअर करा