तेल कंपन्यांनी साखर आधारित इथेनॉलला मागणी कमी नोंदविल्याने इथेनॉलच्या खपाबाबत चिंताग्रस्त असणाऱ्या साखर उद्योगाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत गुरुवारी (ता. ११) या बाबत सकारात्मक भाष्य केल्याने इथेनॉल निर्यातीचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
श्री. पुरी यांच्या या माहितीनंतर आता निर्यातीबाबतच्या नोटिफिकेशनची प्रतीक्षा आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी धान्याधारित इथेनॉलला जादा पसंती दिली. साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलला एकूण मागणीच्या फक्त २८ टक्के मागणी तेल कंपन्यांनी नोंदविली होती. १७०० कोटी लिटर इथेनॉल तयार होत असताना ११०० कोटी लिटर इथेनॉलची मागणी तेल कंपन्यांनी केली. यामुळे जादा ६०० लिटर इथेनॅालचे करायचे काय, असा प्रश्न इथेनॉल प्रकल्पांना पडला होता. साखर कारखानदारांच्या संघटनांनीही या बाबत निर्यातीबरोबर निर्यात अनुदान देण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर श्री. पुरी यांनी इथेनॉल निर्यातीबाबत सकारात्मक निर्णय होणार असल्याचे सांगितले.