जागतिक बँकेच्या कृषी आणि अन्न जागतिक विभागाने ‘कृषी परिवर्तनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ हा अहवाल गेट्स फाउंडेशन, मायक्रोसॉफ्ट आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने नुकताच प्रकाशित केला. जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे (एआय) जगभरातील शेती आणि अन्न व्यवस्थेत वेगाने परिवर्तन घडवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालात कृत्रिम बुद्धिमत्तेचे शेतीतील महत्त्वपूर्ण उपयोग, त्यासाठी लागणारी गुंतवणूक तसेच विकसनशील देशांमध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक पद्धतीने कसा वापर करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
‘एआय’च्या माध्यमातून वाणाची तपासणी
जागतिक बँकेच्या अहवालात आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेला (IRRI) विशेष स्थान देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेने भात जनुक पेढीत जतन केलेल्या विविध बियाण्यांचे विश्लेषण जलद आणि कमी खर्चात करण्यासाठी कॉम्प्युटर व्हिजन आणि मशीन लर्निंग आधारित प्रणाली विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी १,३२,००० नमुन्यांपैकी केवळ ५ टक्के नमुने वापरणे शक्य होत होते, कारण त्यांची हाताने तपासणी करणे खर्चीक आणि वेळखाऊ होते. परंतु नवीन एआय-आधारित प्रणालीमुळे एका हंगामात ६०,००० नमुन्यांचे परीक्षण पूर्ण झाले. म्हणजेच गेल्या पाच दशकांच्या तुलनेत तीन पट जास्त वेगाने काम झाले.