यंदा कापूस खरेदीने वेग घेतला आहे. भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) राज्यात २० लाख क्विंटल खरेदीचा टप्पा गाठला आहे. तर अकोला विभागातील जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तब्बल १२ लाख क्विंटलहून अधिक कापूस खरेदी करण्यात आला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदाची खरेदी लक्षणीयरित्या वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अकोला कार्यालयाच्या अखत्यारित जिल्ह्यांमध्ये ८४ खरेदी केंद्रे सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसांत आणखी काही केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. रविवारपर्यंत (ता. ७) झालेल्या खरेदीचा आढावा घेतला असता वेग आल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची केंद्रांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. अकोट येथील केंद्रावर तर सोमवारी सकाळपासून वाहने रांगेत उभी होती. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ७.७५ लाख क्विंटल खरेदी झाली होती. यंदा मात्र तब्बल ३ ते ३.५ लाख क्विंटलांनी अधिक खरेदी झाली आहे.

दरम्यान या हंगामात प्रथमच शेतकऱ्यांना मोबाईल अॅपद्वारे नोंदणीची अट घालण्यात आली आहे. नोंदणीवेळी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पडताळणी, राज्य शासन यंत्रणेची पडताळणी प्रक्रिया, तसेच हेक्टरी उत्पादकतेची मर्यादा या अनेक अडथळ्यांमुळे प्रक्रिया संथ झाली होती. प्रत्यक्ष खरेदी सुरू झाल्यानंतर केंद्रांवर आर्द्रतेचा मुद्दाही चांगलाच गाजला. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत खरेदी मोहिमेने आता गती पकडली आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/ccis-cotton-procurement-gains-momentum-in-vidarbha-rat16

माहिती शेअर करा