राज्य शासनाने आज (ता.१७) केंद्राच्या ‘आत्मनिर्भरता कृषी तंत्रज्ञान व प्रशिक्षण अभियान’ (आत्मा) योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षातील दुसऱ्या हप्त्यासाठी एकूण ३५ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २७ कोटी, अनुसूचित जातींसाठी ४.८७ कोटी आणि अनुसूचित जमातींसाठी ३.८५ कोटी असे वाटप करण्यात येणार आहे. या निधीमुळे राज्यातील कृषी विस्तार यंत्रणा बळकट होऊन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.

आत्मा योजना काय आहे ?

‘आत्मा’ (ATMA) म्हणजे जिल्हा स्तरावर चालणारी कृषी विस्तार सुधारणा योजना असून तिचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनवणे हा आहे. या योजनेखाली शेतकरी प्रशिक्षण, शिबिरे, कृषी मेळावे, नवीन पिकांवरील प्रयोग आणि महिला शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम राबवले जातात. विविध कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी गटांचा समन्वय साधून ही योजना जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत अमलात आणली जाते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व तंत्रज्ञान सहज उपलब्ध होते. या योजनेसाठीचा निधी केंद्र आणि राज्य शासनाच्या ६०:४० या प्रमाणात विभागला गेला आहे. त्यानुसार केंद्राचा हिस्सा २१ कोटी ४७ लाख रुपयांचा तर राज्याचा हिस्सा १४ कोटी ३१ लाख रुपयांचा असे एकत्रित ३५ कोटी ७९ लाख उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-approves-3579-crore-second-installment-for-atma-scheme-202526-sai29

माहिती शेअर करा