ऐन दिवाळीचा सण उत्साहात सुरू असताना वसईच्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसाचा फटका वसईतील शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांच्या भातपिकांचे नुकसान झाले आहे. वसईच्या पूर्व व पश्चिम पट्ट्यातील भागात यावर्षी ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्रात भात पिकांची लागवड करण्यात आली होती. बहुतांश भागात भाताची कणसे चांगल्याप्रकारे कापणीसाठी तयार झाली असून काहींनी कापणीसाठीही सुरवात केली होती.
मात्र दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वसईच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापणीसाठी तयार झालेली भाताची कणसे आडवी झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तर निम गरवे आणि हलव्या भाताची काहींनी कापणी सुद्धा केली होती. त्यांचेही भात पिके भिजून गेल्याने नुकसान झाले आहे. पावसाचे सावट काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही.