जोरदार पावसाचा आडसाली ऊस लागवडीला फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी ऊसाची उशिराने लागवड सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात ऊसाचे एकूण १ लाख ३७ हजार १८१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यत जिल्ह्यात आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू ऊसाची ६७ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. येत्या काळात सुरू ऊस लागवड झाल्यास या क्षेत्रात आणखी वाढ होईल.
यंदा मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाने जोरदार हवेली लावली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पानशेत, पवना, कळमोडी, चासकमान, नीरा देवघर अशी काही धरणे शंभर टक्के भरली. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उजनीत पुरेसा पाणीसाठा झाला आहे. या धरणांमुळे पाणी मुबलक उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ऊसशेतीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत ऊसाकडे शेतकरी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत आडसाली ऊसाच्या लागवडी करतात. त्यानंतर पूर्वहंगामी उसाच्या लागवडी केल्या जातात. आता या आडसाली, पूर्व हंगामी लागवडीचा हंगाम संपला असून सुरू ऊसाच्या लागवडीने वेग पकडला आहे.