दिवाळीनंतर साखर बाजारात सावध वातावरण असून, सध्या साखरेची मागणी थंडावली आहे. येत्या हंगामात नवी साखर येण्याची शक्यता असल्याने व्यापारी सध्या खरेदीसाठी फारसा उत्साह दाखवत नसल्याचे चित्र आहे. केंद्राने नोव्हेंबरसाठी २० लाख टनांचा कोटा दिला आहे. कोटा कमी असला तरी खरेदीही फारशी नसल्याने याचा विशेष फायदा कारखान्यांना होणार नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून दर कमी होत आहेत. सणासुदीच्या काळातही मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने बाजारात फारशी तेजी दिसत नाही.
देशात एक ऑक्टोबरपासून गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. पहिल्या महिन्यात ऊस उत्पादनात राज्यातील अग्रगण्य कारखाने आता हळूहळू सुरू होत आहेत. उत्तर प्रदेशात केवळ पंधरा ते वीस कारखाने सुरू आहेत. महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून ऊस हंगाम सुरू झाला असला तरी पाऊस व शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे अजूनही हंगामाने गती पकडलेली नाही. कर्नाटकातही १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू झाला पण शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे उत्तर कर्नाटकातील कारखाने अजून सुरू झाले नाहीत.