हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ मधील आंबिया बहारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई वाटपाचे काम सुरु आहे. आतापर्यंत ८६० कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. तर उरलेली भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
हवामानातील विविध धोक्यांमुळे फळपिकांना मोठा फटका बसत असतो. पिकांचे उत्पादन कमी होते. यात शेतकऱ्यांचे नुकसानही मोठे होते. पिकांचे नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळावी यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते. आंबिया बहारमध्ये आंबा, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, द्राक्ष आणि मोसंबी तसेच पपई आणि स्ट्राॅबेरी या पिकांसाठी योजना राबविण्यात येते. राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली होती.
हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ मधील आंबिया बहारात शेतकऱ्यांनी २ लाख ३९ हजार अर्ज भरले होते. त्यापैकी पडताळणीत २७ हजार ८२२ अर्ज बोगस निघाले. तर २ लाख ११ हजार अर्ज भरपाईसाठी पात्र ठरले होते. या अर्जापोटी शेतकऱ्यांना ८६० कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले. तर उरलेली रक्कम लवकरच जमा करण्यात येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.