पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग या पिकांचा समावेश आहे. या योजनेतील सहभाग कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. विमा अर्ज सादर करण्यासाठी रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू (बागायती), हरभरा या पिकांसाठी १५ डिसेंबर तर भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ अंतिम मुदत आहे. या योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे.
राज्य शासनाने कप अँड कॅप मॉडेलनुसार (८०-११०) बीड पॅटर्ननुसार राबविण्यास मान्यता दिली आहे. रब्बी अन्नधान्य व गळीतधान्य यासाठी शेतकरी विमा हप्तादर १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के आहे. पिकांचे उंबरठा उत्पादन हे सर्व पिकांसाठी त्या हंगामातील मागील ७ वर्षांपैकी सर्वाधिक उत्पदनाच्या ५ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखीमस्तर असेल.