राज्य शासनाकडून अतिवृष्टिग्रस्त आणि रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत गुरुवारी (ता. १३) आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. जावळे, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे आदी उपस्थित होते. या वेळी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना गुरुवार (ता. २०) पर्यंत मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.
बैठकीत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सुमारे ४२०० शेतकऱ्यांचे खाते, नाव व फार्मर आयडीमध्ये विसंगती (मिसमॅच) असल्याने त्यांना शासन मदतीचा लाभ मिळू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर आमदार सावरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचे आदेश दिले. सध्या ई-केवायसी साइट बंद असल्याचे लक्षात घेऊन ती तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.