एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कमी खर्चाचे कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह (Low-Cost Onion/Garlic Storage Structure) उभारणी प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली. शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परंतु पारंपरिक पद्धतीने जमीनित पसरवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीत साठवणूक केल्याने कांदा खराब होऊन मोठे नुकसान होते. गुणवत्तेवर परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढत असून या पार्श्वभूमीवर कमी खर्चातील साठवणूक गृहासाठी सरकारतर्फे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या योजनेतून कांदा साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान कमी करणे, हंगामात वाढणारी आवक व हंगामाबाहेरील तुटवडा यावर आंशिक नियंत्रण ठेवून भावातील चढउतार कमी करणे अशी योजनेची उद्दीष्ट्ये आहेत. प्रकल्प खर्च ३० लाखांपेक्षा जास्त असल्यास बँककर्ज अनिवार्य राहील. अर्थसहाय्य क्रेडीट लिंक्ड बॅक-एंडेड सबसिडी स्वरूपात बँक कर्जाच्या परताव्यादरम्यान उपलब्ध होईल.