अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे मॉन्सून खेचून आणला असून, राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. आज (ता. २६) रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून जाणार आहे. तर पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, उत्तर तेलंगणा, छत्तीसगड ते ओडिशापर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रात आल्याने राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाने सरी पडत आहेत. रविवारी सकाळपर्यंत (ता. २५) दौंड येथे उच्चांकी १६० मिलीमीटर तर बारामतीमध्ये १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी दिवसभर पुणे जिल्ह्यासह कोकणात पावसाचा जोर वाढला होता.
आज (ता. २६) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.