शेतजमिनीच्या ताबा व वहिवाटीवरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारे जुने वाद सौहार्दाने मिटविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सलोखा योजनेस १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नाममात्र शुल्कात आपल्या ताब्यातील शेतजमिनीची परस्पर संमतीने अदलाबदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेत केवळ एक हजार रुपये नोंदणी शुल्क व एक हजार रुपये मुद्रांक शुल्क भरून शेतजमिनीची अदलाबदल करता येणार आहे. शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियेत ते अनेक वर्षे प्रलंबित राहतात. परिणामी, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागतो. शेतजमीन हा संवेदनशील विषय असल्याने अशा वादांमुळे कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये तणाव, दुरावा व असंतोष निर्माण झाला आहे. अनेक पिढ्यांचे नुकसान या वादांमुळे झाले असून, सध्याच्या पिढीचाही वेळ व खर्च वाया जात आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/salokha-scheme-extended-till-2027-rat16