सांगली जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम म्हणजेच विंड्स प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी ५४६ शासकीय जागांची उपलब्ध झाली आहे. तर २३ जागा या भाडेतत्त्वावर निवडल्या आहेत. या जागांचे कंपनी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर हवामान केंद्र उभारणीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
जिल्ह्यात विंड्स प्रकल्पाअंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून इंटरनेट, मोबाइल ॲपद्वारे हवामानाची माहिती उपलब्ध होणार आहे. सातशे ग्रामपंचायत स्तरावर ही केंद्रे उभारली जाणार आहेत. ही केंद्रे उभारणी करण्यासाठी जागांची आवश्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रामुख्याने शासकीय जागेत ही केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सातशे ग्रामपंचायतीपैकी ६८ महावेध प्रकल्पांअंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली आहेत. ग्रामपंचायत स्तरावर स्वचंयलित हवामान केंद्रांची उभारणी झाल्यास नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही केंद्रे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहेत.