द्राक्षपंढरीतून २०२५-२६ हंगामात द्राक्ष निर्यात बिगर युरोपियन व नंतर युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मालाची उपलब्धता कमी असल्याने यंदा नोव्हेंबरपासून दरात तेजी कायम आहे. परिणामी निर्यातीच्या अनुषंगाने दर जुळत नसल्याने आयातदारांकडून मागणी कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभीच भारतीय द्राक्षांची निर्यात थंडावल्याचे चित्र आहे.
नाशिकमधून नोव्हेंबर-२०२५मध्ये बिगर युरोपियन देशांमध्ये, तर जानेवारी-२०२६ मध्ये दुसऱ्या सप्ताहात युरोपियन देशांमध्ये निर्यात सुरू झाली आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत प्रारंभीच्या निर्यातीचे हे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांनी कमी आहे. युरोपमध्ये होणाऱ्या द्राक्ष निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेटनेट’ प्रणालीत द्राक्षांची नोंदणी करावी लागते. त्यात नाशिकमध्ये यंदा (ता. १३) अखेर १० हजार ६९९ हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली आहे. हीच नोंदणी(ता. १३ जानेवारी २०२५)अखेर १७ हजार ९९९ हेक्टर होती. त्यामुळे यंदा ७,३०० हेक्टर क्षेत्रावर आत्तापर्यंत तुलनेत कमी नोंदणी दिसून येत आहे.
खरड छाटणी झाल्यानंतर मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे सूक्ष्म घडनिर्मितीसाठी आवश्यक सूर्यप्रकाश मिळाला नव्हता. सुरुवातीला अतिवृष्टी व संततधार पाऊस, तर नंतर बागेत पाणी साचून राहिल्याने द्राक्ष बागांच्या मुळ्या कुजून गेल्या. त्यामुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान समोर आले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी यंदा द्राक्षहंगाम उभा केला आहे. मात्र उत्पादनात मोठी घट असून त्याचे परिणाम सुरुवातीपासूनच दिसून येत आहेत. भारताची निर्यात सुरू झाली असली तरी दक्षिण आफ्रिकेतील द्राक्ष युरोपियन बाजारात दाखल झाले असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. ही द्राक्ष भारतीय द्राक्षांच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची संधी मिळाली आहे.