खानदेशात रब्बी हंगामात केळी व इतर पिकांसाठी पीक कर्ज प्रस्ताव बँकांकडे दाखल होत आहेत. सुमारे पाच हजार प्रस्ताव सादर झाले असून, किमान ८०० कोटी रुपये निधीची गरज त्यासाठी असणार आहे. खानदेशात फक्त ७०० कोटी रुपये निधी वितरण रब्बी पीक कर्जासंबंधी करण्याचे नियोजन बँका, प्रशासनाने केले आहे. अशात आणखी १०० ते १५० कोटी रुपये निधीची व्यवस्था, तरतूद पीक कर्जासाठी करावी लागेल, असाही मुद्दा आहे.
खरिपात खानदेशात सुमारे २८०० कोटी रुपये निधीची आवश्यकता असते. या तुलनेत रब्बीमध्ये पीक कर्जाची कमी मागणी असते. याबाबत मध्यंतरी प्रशासनाने नियोजन केले होते. त्यात मागणी व निधी यावर चर्चा झाली होती. मागील एप्रिल, मे महिन्यात अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकले नाही. जूनपासून कर्ज प्रस्ताव मार्गी लावण्याचे काम वेगात सुरू झाले. या प्रस्तावांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव अनेकांना शक्य झाली नाही.