इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धाचा भडका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाहून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे. भारतीय तेल कंपन्या सध्या रशियाकडून प्रतिदिवस २० ते २२ लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करीत आहेत. मागील दोन वर्षांतील हा उच्चांकी आकडा असल्याचे जागतिक व्यापार विश्लेषक कंपनी ‘केपलर’कडून सांगण्यात आले आहे. इराण-इस्राईल युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे येत्या काळात युद्धाची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. या युद्धाचा परिणाम इंधन बाजारावरही झाला असून कच्च्या तेलासह अन्य इंधनाचे दर भडकले आहेत. वैश्विक बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचे दर ७५ डॉलर्सच्या वर गेले आहेत. युद्ध लांबले तर हे दर शंभर डॉलर्सवर जाण्याची भीती विश्लेषक व्यक्त करीत आहेत. इंधनासाठी तेल उत्पादक देशांवर अवलंबून असलेल्या देशांचे आर्थिक गणित यामुळे बिघडू शकते. सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिरात आणि कुवेत हे भारताचे पारंपरिक तेल पुरवठादार देश आहेत. मात्र दोन – तीन वर्षांत भारताने रशियाहून तेलाची आयात वाढवली आहे.

अमेरिकेकडूनही आयात

सरत्या मे महिन्यात भारताने रशियाहून १९.६ लाख बॅरल प्रतिदिवस कच्च्या तेलाची आयात केली होती. तर जूनमध्ये हा आकडा २० लाख बॅरलच्या वर गेला आहे. जूनमध्ये अमेरिकेहून होणारी कच्च्या तेलाची आयातही वाढली आहे. सदर महिन्यात अमेरिकेहून चार लाख ३९ हजार बॅरल प्रतिदिवस इतकी तेलाची आयात करण्यात आली. मे महिन्यात हा आकडा दोन लाख ८० हजार बॅरल इतका होता. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा क्रूड तेलाचा आयातदार देश आहे.

युद्धावेळी मोठ्या प्रमाणात आयात

रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान २०२२मध्ये युद्धाला सुरुवात झाली होती. त्यावेळी अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध घातले होते. मात्र याचवेळी भारताने रशियन तेलाच्या मोठ्या प्रमाणातील आयातीला सुरुवात केली होती. कधीकाळी देशाला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी अवघे एक ते दोन टक्के तेल भारत रशियाकडून खरेदी करत असे. मात्र अलीकडील काळात हे प्रमाण ४० टक्क्यांच्या वर गेले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/indias-russian-crude-imports-hit-record-high-amid-iran-israel-conflict-mj18

माहिती शेअर करा