राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे आणि त्यांचे उत्पादन किमान आधारभूत किमतीने विकता यावे, यासाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत केली जाणारी कापूस खरेदी मर्यादा मागील वर्षाप्रमाणे वाढवावी, अशी मागणी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत फडणवीस यांना पत्र पाठवून प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली आहे.

धोत्रे यांनी पत्रात म्हटले आहे, की सीसीआयमार्फत करण्यात येणारी कापूस खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र यंदाच्या हंगामात सीसीआयने कापूस खरेदीसाठी प्रति एकर केवळ ५.६० क्विंटल इतकी उत्पादनमर्यादा निश्चित केली आहे. ही मर्यादा कमी आहे. प्रत्यक्षात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम या प्रमुख कापूस पट्ट्यातील शेतकरी प्रति एकर १२ ते १५ क्विंटलपर्यंत कापूस उत्पादन घेतात. मागील वर्षी ‘सीसीआय’ने उत्पादन मर्यादा प्रति एकर १२ क्विंटल (हेक्टरी ३० क्विंटल) इतकी ठेवली होती. यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण उत्पादनावर किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) कापूस विक्रीची संधी मिळाली होती.

https://agrowon.esakal.com/agro-special/the-cotton-purchase-limit-in-the-state-should-be-30-quintals-per-hectare-abhi47

माहिती शेअर करा