केंद्राने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क काढल्यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ऑक्टोबरमध्ये कापसाची खरेदी सुरू करणार आहे. तसेच ‘सीसीआय’ जास्त खरेदीसाठी तयार असून, शेतकऱ्यांनी घाबरून विक्री (पॅनिक सेलिंग) करू नये, असे आवाहन ‘सीसीआय’चे अध्यक्ष ललितकुमार गुप्ता यांनी केले आहे. देशातील बाजारात सध्या शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी बाजारात येत नाही.
त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारातील हालचालींचा परिणाम दिसून येत नाही. परंतु ‘सीसीआय’ आणि हजर बाजारातील कापसाचा भाव कमी झाला आहे. ‘सीसीआय’ने आपल्या कापूस विक्रीचे दर खंडीमागे ११०० रुपयांनी कमी केले आहेत. एक खंडी ३५६ किलोची असते. तसेच हजर बाजारातही भाव कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचा कापूस ऑक्टोबरपासून बाजारात दाखल होईल. तर नोव्हेंबरपासून आवकेचा दबाव वाढेल.
या काळात बाजारातील दर दबावात येण्याची शक्यता आहे. ‘‘बाजारात दर कमी झाल्यानंतर सीसीआय कापसाची खरेदी करेल. सीसीआय सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बाजारात खरेदीत असेल. यंदा गेल्या वर्षीपेक्षा कापसाची खरेदी जास्त होऊ शकते, याच अंदाज आम्ही आधीच बांधला आहे. सीसीआय जास्त कापूस खरेदीसाठीही तयार आहे. जास्त खरेदीसाठी अडचणी येणार नाहीत. कोरोना काळात २०० लाख गाठी हातळल्या आहेत,’’ असे श्री. गुप्ता म्हणाले.
https://agrowon.esakal.com/agro-special/cci-ready-to-purchase-excess-cotton-rat16