देशभरात बेदाण्याची मागणी अपेक्षेपेक्षा कमी असल्याने बाजारात उठाव मंदावला असला, तरी दर मात्र स्थिर राहिले आहेत. प्रतवारीनुसार २५० ते ४१५ रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. दरात मोठे चढ-उतार होण्याची शक्यता नाही, असा अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बेदाणा निर्मिती हंगाम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षीचा दीड ते दोन हजार गाडी बेदाणा अजून शिल्लक आहे. नवीन बेदाणा विक्रीला येईपर्यंत पुरवठा होईल. गेल्या पंधरा दिवसांपासून देशभरात बेदाण्याची मागणी फारशी नाही. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दरात प्रति किलोस २० रुपयांनी वाढ झाली होती. बाजारपेठेतील मागणीचा अंदाज घेऊनच शेतकरी बेदाणा विक्री करत असल्याने दर चांगले राहिले आहेत.

बेदाणा शेडवर हंगामाच्या पूर्व तयारीसाठी परराज्यातून २० हजारांहून अधिक मजूर दाखल होतात. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाणा शेडची डागडुजी केली जाणार आहे. त्यादृष्टीने आत्तापासून शेड मालकांनी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रारंभ होईल. अर्थात नवा बेदाणा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विक्रीस येण्याची शक्यता आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/raisin-season-likely-to-start-in-february-rat16

माहिती शेअर करा