भारत-अमेरिका व्यापार करारावरून जोरदार टीका होत असतानाच बासमती तांदूळ निर्यातीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका भारतीय निर्यातदाराने अमेरिकेतील एका खरेदीदाराला पाच हजार टन बासमती तांदळाचा पुरवठा करण्यासाठी व्यावसायिक करार केला आहे. हा निर्यातदार भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाचा (आयआरईएफ) सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम झाल्यानंतरची ही एक महत्त्वाची घडामोड आहे. या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील रेसिप्रोकल म्हणजेच परस्पर शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सहमती दर्शवली आहे.‘आयआरईएफ’च्या एका सदस्याने अमेरिकेतील एका खरेदीदाराला पाच हजार टन बासमती तांदूळ पुरवण्यासाठी यशस्वीपणे व्यावसायिक करार केला आहे,’ असे निवेदनात म्हटले आहे. निर्यात करताना दर्जा कायम राहावा यासाठी सर्व तांदूळ निर्यातदारांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे महासंघाने पुढे नमूद केले आहे.
पारंपरिक लांब दाणे आणि सुगंधासाठी बासमती तांदळाची फार पूर्वीपासून ओळख राहिली आहे. विशेषतः इराण हा भारतीय बासमती तांदळाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा खरेदीदार देश राहिला आहे. पण इराणमधील संघर्षामुळे निर्यातीत घट झाली आहे. पण आता अमेरिकेतून बासमती तांदळाला मागणी सुरू झाल्याने निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेकडून बासमती तांदळासह भारतीय उत्पादनांवर ५० टक्के आयात शुल्क लादण्यात आले. यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय बासमतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. परिणामी, विशेषतः पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारतीय निर्यातदारांची स्पर्धात्मकता कमी झाली आणि अनेक निर्यातीबाबतच्या ऑर्डर्स रद्द झाल्या अथवा त्या कमी करण्यात आल्या.
https://agrowon.esakal.com/market-intelligence/indian-basmati-5000-ton-order-from-usa-rat16