इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युध्दाचे सावट आता खानदेशातील केळी बाजारावर दिसत आहेत. युध्दामुळे आखाती देशांना होणारी केळी निर्यात ठप्प झाली आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेला बसला आहे. तसेच, रमजानच्या पवित्र महिन्यात जिथे केळीला मोठी मागणी असते, तिथे निर्यातीचे मार्ग बंद झाल्याने उत्पादक आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.
निर्यात साखळी विस्कळीत; १२ कंटेनरचा पुरवठा थांबला
जळगाव जिल्ह्यातून दररोज केळीचे १२ कंटेनर आखाती देशांकडे पाठवले जातात. मात्र, युद्धस्थितीमुळे विमानसेवा बंद होणे आणि समुद्री वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने ही निर्यात साखळी विस्कळीत झाली आहे. त्यातच, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर मुस्लिम देशांत शोकाचे वातावरण आहे. त्यामुळे रमजानमधील बाजारपेठेतील उत्साह कमी झाला असून आखाती देशांतील फळांची मागणी घटली आहे. परिणामी, निर्यातीसाठी तयार असलेली केळी माल आता स्थानिक बाजारातच अडकून पडली आहेत.
केळीच्या दरात १००० रुपयांची मोठी घसरण
तसेच, युद्ध सुरू होण्यापूर्वी केळीला प्रति क्विंटल सुमारे २,५०० रुपयांचा चांगला भाव मिळत होता. मात्र निर्यात थांबताच स्थानिक बाजारात मालाची आवक वाढली आणि दर घसरले. अवघ्या काहीच दिवसांत केळीचा दर १,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. तसेच, प्रति क्विंटल तब्बल १,००० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
https://agrowon.esakal.com/agro-special/onion-grape-banana-export-halt-india-rat16