केंद्र सरकारने देशात २३ लाख ७ हजार टन हरभरा खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यापैकी राज्यात ७ लाख ६१ हजार टन हरभरा खरेदी होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्येही खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. यंदा हरभऱ्याला प्रति क्विंटल ५ हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता.२४) रात्री विविध राज्यांचे कृषिमंत्री आणि अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात त्यांनी हरभरा, मोहरी आणि मसूर खरेदीला मंजुरी दिली. मध्य प्रदेशात ५.८ लाख टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये अनुक्रमे ५.५३ लाख टन आणि ४.१३ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी देण्यात आली.
देशात यंदा हरभरा लागवडीत यंदा पाच टक्क्यांची वाढ झाली. तसेच पिकासाठी पोषक हवामान होते. त्यामुळे यंदा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या बाजूला आयातही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आयातीच्या लोंढ्यामुळे हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांना हरभऱ्यासाठी ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. त्यामुळे हमीभावाने हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. राज्य सरकारनेही हरभरा खरेदीला मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यात ७ लाख ६१ हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-7-61-lakh-tonne-chana-procurement-approval-rat16