ऊस गाळप हंगामापुरते मर्यादित राहणारे साखर कारखाने आता वर्षभर कार्यरत ठेवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. मका व धान्य आधारित इथेनॉल उत्पादनाला चालना देणाऱ्या मल्टिफीड डिस्टिलरी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यानंतर देशभरातील ६३ साखर कारखान्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच कारखान्यांचा समावेश आहे. उसाव्यतिरिक्त मका, बीट, तांदूळ, ज्वारी आदी धान्यांचा वापर करून इथेनॉल निर्मिती करण्याची क्षमता विकसित केल्यास कारखाने २०० ते २५० दिवस चालू ठेवणे शक्य होणार आहे.

मर्यादित उसाचे क्षेत्र आणि वाढत्या कारखान्यांमुळे काही वर्षांपासून गाळप हंगाम १०० दिवसांवर आला आहे. त्यातच कारखान्यांच्या गाळप क्षमतेमध्येही प्रचंड वाढ झाली. केंद्र सरकारकडून केवळ सहकारी कारखान्यांसाठी मल्टिफीड प्रकल्प उभारण्यासाठी व्याज अनुदान दिले जात आहे. या योजनेमुळे कारखान्यांना कर्जावरील व्याजदरात सवलत मिळत असून, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारण्याचा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. मळीपुरते (मोलासेस) मर्यादित असलेले इथेनॉल उत्पादन आता मका व धान्यांवर आधारित केल्यास वर्षभर उत्पादन शक्य होणार आहे.

सध्या बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ९० ते १०० दिवसांवर आला आहे. उर्वरित कालावधीत यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाला कारखान्यांना काम देता येत नाही. मल्टिफीड प्रकल्पामुळे कारखान्यांची उत्पादनक्षमता वाढून वर्षातील जास्त दिवस उद्योग सुरू ठेवता येणार आहे.त्यामुळे कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मका व धान्य विक्रीसाठी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. दरम्यान, अन्नसुरक्षेचा प्रश्‍नही निर्माण होणार आहे. इथेनॉल उत्पादन वाढवून पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रण करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्या पार्श्‍वभूमीवर साखर उद्योगाकडून इथेनॉल निर्मिती क्षमतेत वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील पाच कारखान्यांनी या योजनेंतर्गत पुढाकार घेतला आहे. आगामी काळात आणखी काही कारखाने योजनेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/factories-to-operate-year-round-maharashtra-rat16

माहिती शेअर करा