अमेरिकेला निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनांपैकी ७५ टक्के उत्पादनांवर शून्य टक्के कर आकारणी करण्यात येणार असल्याने भारताच्या अमेरिकेसोबतच्या व्यापारात मोठी वाढ होणार असल्याचा दावा ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या एका अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार, कृषिजन्य उत्पादनांच्या बाबतीत भारताचा अमेरिकेसमवेतचा व्यापार अधिशेष (ट्रेड सरप्लस) १.३ अब्ज डॉलर्स आहे. आता तब्बल १.३६ अब्ज डॉलर्सची भारतीय कृषिजन्य उत्पादने कुठल्याही करांविना अमेरिकेत दाखल होतील. याचा भारतीय शेतकरी व निर्यातदारांना व्यापारवाढीत फायदा होईल.ही करकपात भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता वाढवेल, बाजारपेठेतील प्रवेश विस्तारेल आणि शेतकरी-निर्यातदारांना मोठ्या प्रमाणात मालनिर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देईल. यातून भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार अधिशेष आणखी भक्कम होईल.
१.०३५ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या भारतीय उत्पादनांवर शून्य अन्योन्य कर (झिरो रेसिप्रोकल टॅरिफ) असणार असल्याची हमी देण्यात आल्यामुळे भारतीय शेतकरी व निर्यातदारांना व्यापारात स्वतःचे स्थान उंचावण्यास मदत होईल, या बाबीकडे या अहवालाने लक्ष वेधले आहे.तांदूळ, मसाले, तेलबिया, चहा आणि कॉफी यांच्यासह इतर कृषिजन्य उत्पादनांना यातून फायदा होईल. भारतीय तांदळाची अमेरिकेकडून होणारी आयात जवळपास २४ टक्के आहे. ही बाब भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडणारी आहे, असे हा अहवाल सांगतो. चहा, कॉफी आणि मसाल्यांचा वाटा ३ टक्क्यांचा आहे. नवी करप्रणाली या उत्पादनांच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याची शक्यता आहे, असेही त्यात म्हटले आहे.
https://agrowon.esakal.com/sampadkiya/india-us-trade-growth-rat16