सोलापूरसह राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी ३० जून व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने बॅंकांकडून मागविली आहे. यात १९९० पासूनचे थकबाकीदार असून, वारंवार कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचीही माहिती आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे २४ हजार शेतकरी थकबाकीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना पाच-सात वर्षांनंतर कर्जमाफी का मागावी लागते, दरवर्षी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी थकबाकीत जातात, त्यांची पीकपद्धती, तेथील जमीन व पाण्याची सोय, हवामान या बाबींचा अभ्यास कृषी विभागाकडून केला जात आहे. राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, या समितीचाअहवाल पुढील दीड महिन्यांत शासनाला सादर होणार आहे.
त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. कर्जमाफीसाठी साधारणतः ४० हजार कोटी रुपये लागणार आहेत. ३० जून २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे ३५ हजार ४७७कोटींची थकबाकी आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पावणेतीन लाख शेतकरी थकबाकीत असून, त्यांच्याकडे तीन हजार ९७६ कोटींची थकबाकी आहे. दरम्यान, २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांचीही माहिती सहकार विभागाने मागविली असून त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/solapur-district-cooperative-bank-farmer-dues-sai29