पश्चिम आशियाई देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका भारतीय कृषी निर्यातीला बसला आहे. मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) येथे निर्यातीसाठी आलेले ३०० हून अधिक कंटेनर अडकून पडले असून बंदर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामध्ये कांदा, द्राक्षे आणि केळी यांसारख्या नाशवंत शेतीमालाचा मोठा समावेश असल्याने निर्यातदारांसह उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी आधीच अडचणीचे ठरले आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन घेतले असतानाच निर्यातीमुळे खर्च भरून निघण्याची आशा होती. मात्र अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे सागरी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही शिपिंग कंपन्यांनी आखाती देशांकडे माल नेण्यास नकार दिल्याने जेएनपीटीवरील कंटेनर खोळंबले आहेत. पश्चिम आशियातील तणाव निवळेपर्यंत ही कोंडी सुटण्याची शक्यता कमी असल्याचे निर्यात क्षेत्रातून सांगितले जात आहे.
कंटेनर अडकले; लागल्या लांब रांगा
जेबेल अली (दुबई) हे मध्य पूर्वेतील सर्वांत मोठ्या बंदरांपैकी एक असून, जगातील व्यस्त कंटेनर टर्मिनलमध्ये त्याचा समावेश होतो. येथून शेतीमालाची आयात आणि आखाती देशांमध्ये पुढील पुरवठा केला जातो. मात्र शनिवारी (ता. २८) दुपारी ४ नंतर बंदर परिसरातील कामकाज थांबविण्यात आल्याने सुमारे २०० हून अधिक कंटेनर उतरविण्यात आलेले नाहीत.
https://agrowon.esakal.com/market-intelligence/onion-grape-banana-export-halt-india-rat16-2