केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, (सीआयएई) भोपाळ ने कापूस वेचणी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र भारतीय बनावटीचे ट्रॅक्टरचलित, टु-रो कॉटन स्ट्रिपर हार्वेस्टर या प्रकारचे असल्याचे मत संस्थेचे संचालक डॉ. सी. आर. मेहता यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) नागपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यासह देशभरातील इतरही काही संस्थांमध्ये यांत्रिक कापूस वेचणीवर काम झाले.

परंतु याबाबतचे बहुतांश संशोधनात्मक प्रयोग अर्धवटच गुंडाळण्यात आले. सन २०१५ दरम्यान ‘सीआयसीआर’ने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून कापूस वेचणी यंत्र तयार करून लवकरच या बहुप्रतिक्षित यंत्राचे लोकार्पण करण्याचा दावा देखील केला होता. परंतु या यंत्राचे पुढे काय झाले, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.

२०११-१२ दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेन्सरवर काम करणारे कापसाची उमललेली बोंडे अलगद वेचणारे यंत्र विकसित केले होते. या यंत्राचे पेटंट घेण्यात आले, शेतकऱ्यांच्या शेतावर यंत्राचे प्रात्यक्षिकही झाले. परंतु हे यंत्रे बाजारात आणण्यासाठी व्यावसायिक मिळाले नाहीत. शिवाय या यंत्राने वेचणी करताना कचरा खूप येत असल्याने पुढे विद्यापीठाने देखील त्याचा पाठपुरावा केला नाही.

परिणामी यंत्र बाजारात आले नाही. असे आत्ता विकसित यंत्राचे होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. मजुरीचे दर प्रचंड वाढले आहेत. प्रतिकिलो वेचणीला १५ ते २० रुपये मोजले तरी कापूस वेचणीच्या कामास कोणी धजावत नाही. अशा वेळी कापूस वेचणी यंत्राची गरज किती आहे, याचा अंदाज आपल्याला यायला हवा. त्यामुळे ‘सीआयएई’ने विकसित यंत्राची व्यावसायिक निर्मिती होऊन ते देशभरातील कापूस उत्पादकांच्या शेतात शक्य तेवढ्या लवकर पोहोचतील, हे पाहावे लागेल.

https://agrowon.esakal.com/sampadkiya/cotton-picking-machine-welcomed-but-concerns-remain-rat16

माहिती शेअर करा