भारत- अमेरिकेदरम्यान झालेल्या अंतरिम व्यापार करारावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. रविवारी (ता. १५) ‘एक्स’ या समाजमाध्यमावर त्यांनी या कराराच्या अनुषंगाने मोदी यांना प्रश्न विचारले. तसेच या कराराच्या नावाखाली ‘आपण भारतीय शेतकऱ्यांचा विश्वासघात अनुभवतो आहोत’, अशा शब्दांत त्यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
हा करार अस्तित्वात आल्यापासून गांधी केंद्र सरकारवर शरसंधान साधत आहेत. तसेच या करारातून मोदी यांनी देश विक्रीला काढल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार करत आहेत. हा विषय देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे सांगत या कराराद्वारे दुसऱ्या देशाला भारताच्या कृषी क्षेत्रावर दीर्घकालीन नियंत्रण प्रस्थापित करण्यास केंद्र सरकार परवानगी देत आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारत गांधी म्हणाले, की डीडीजीएस आयात करण्याचा वास्तवातील अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे का, की भारतीय पशुधनाला अमेरिकन जीएम मक्यापासून बनलेले ‘डिस्टिलर्स ग्रेन्स’ खाऊ घालण्यात येतील. यातून आपली दुग्धजन्य उत्पादने अमेरिकन शेतीउद्योगावर अवलंबून राहणार नाहीत काय?सोयाबीन आयातीसंदर्भात प्रश्न विचारताना गांधी म्हणाले, की जर भारताने जीएम सोयातेल आयातीला परवानगी दिली तर त्याचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि देशाच्या इतर भागांतील सोयाबीन उत्पादकांवर काय परिणाम होतील? हे शेतकरी दराबाबतचा आणखी एक धक्का कसा सहन करू शकतील?
https://agrowon.esakal.com/agro-special/solapur-district-cooperative-bank-farmer-dues-sai29