स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या दुसऱ्या दिवशी होऊ घातलेल्या तिसऱ्या मुंबईसाठी रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली. या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २१) युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्यूचर्स कलेक्टिव्ह -लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग -सिंगापूर यांच्यासोबत महाराष्ट्र सरकारने तांत्रिक करार केले. यातून एक प्रकारे केवळ गुंतवणूक नाही, तर ज्ञान आणि तंत्रज्ञानातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यारीतीने काम करता येईल. शहरी विकास आराखडा, वाहतुकीशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील पायाभूत सुविधांची सरंचना चांगल्या रीतीने करता येणार आहे.

नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर पेण येथे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

https://agrowon.esakal.com/agro-special/raigad-pen-growth-centre-announced-at-davos-as-part-of-third-mumbai-vision-sai29

माहिती शेअर करा