केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (ता. १) संसदेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, संशोधन, रोजगार, क्रीडा तसेच क्रिएटर इकॉनॉमीला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यात, देशभरात पाच नवीन विद्यापीठ टाउनशिप स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. या विद्यापीठ टाउनशिपमध्ये शैक्षणिक सुविधा, संशोधन केंद्रे, वसतिगृहे, क्रीडा मैदाने आणि स्टार्टअपसाठी स्वतंत्र जागा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना नवकल्पना विकसित करण्यासाठी पोषक वातावरण मिळणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.
क्रिएटर इकॉनॉमीला प्रोत्साहन दरम्यान, संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भविष्यातील रोजगार संधी लक्षात घेऊन अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) उद्योगासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच, २०३० पर्यंत सुमारे २० लाख सोशल मीडिया प्रोफेशनल्स घडविण्याचे उद्दिष्ट असून, देशातील १५ हजार माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स उभारल्या जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) या अभ्यासक्रमांची आखणी व देखरेख करणार आहे. या अंतर्गत व्हिडिओ एडिटिंग, पॉडकास्टिंग, ग्राफिक डिझाइन, डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाणार असून, यामुळे भारत जागतिक गेमिंग हब म्हणून पुढे येईल, असेही त्यांनी सांगितले.मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मुलींची वसतिगृहे उभारली जाणार आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील मुलींना शहरांमध्ये सुरक्षित वातावरणात उच्च शिक्षण घेता येणार आहे. या निर्णयामुळे महिला साक्षरतेचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि प्रयोगशाळांना विशेष निधी देण्यात येणार आहे, असा दावा केला.