‘अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामध्ये भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे पूर्ण संरक्षण करण्यात आले असून त्यामध्ये कसल्याही प्रकारची सौदेबाजी केलेली नाही. दोन्ही देशांतील परस्पर सामंजस्यातून हा करार पूर्णत्वास गेला आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी (ता.८) माध्यमांशी बोलताना केले. चौहान यांनी यावेळी व्यापार कराराविषयीचे विरोधकांचे आरोप खोडून काढले.

ते म्हणाले, ‘‘ या कराराने शेतकरी आणि कृषी क्षेत्राला पूर्ण संरक्षण दिले असून देशहिताला प्राधान्य देऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाच्या कृषी उत्पादनांना या करारापासून दूरच ठेवण्यात आले आहे. कोणत्याही उत्पादनामुळे शेतकऱ्यांना थोडीदेखील हानी पोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.’’

काँग्रेसवर शरसंधान साधताना चौहान म्हणाले की, अनेक वर्षे देशावर सत्ता गाजवूनदेखील काँग्रेसला आपल्या शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान मिळवून देण्यात यश आले नव्हते. ते या करारामुळे साध्य झाले आहे. याच करारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक स्थैर्य मिळू शकेल.दरम्यान, हा व्यापार करार म्हणजे अमेरिकेसमोर सपशेल शरणागती पत्करण्यासारखे असल्याची टीका काँग्रेससह विरोधकांनी केली होती. विरोधकांचा हा आरोप चौहान यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘‘ आम्ही समतोल दृष्टिकोन आणि रचनात्मक संवादाच्या माध्यमातून हा करार मार्गी लावला आहे. भारतीय मुत्सद्देगिरी, विकास आणि प्रतिष्ठेचे हे एक अनोखे उदाहरण आहे. आमच्या मुत्सद्देगिरीमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व आहे,’’ असे कृषिमंत्री चौहान म्हणाले.

https://agrowon.esakal.com/agro-special/there-is-no-bargaining-in-the-trade-agreement-with-the-us-rat16

माहिती शेअर करा