कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केवळ प्रगत देशांपुरती मर्यादित न राहता विकसनशील देशातही त्याचा कसा वापर केला जात आहे, याकडे ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी ‘एआय’चा वापर करणाऱ्या एका भारतीय शेतकऱ्याचे उदाहरण दिले. जगभरात विशेषतः दक्षिण आशियायी देशांमध्ये ‘एआय’चा जलद गतीने कसा प्रसार होत आहे याची त्यांनी माहिती दिली.
या बाबत नाडेला म्हणाले, की २०२३ च्या सुरुवातीलाच भारतातील एका ग्रामीण भागातील शेतकऱ्याने त्याच्या स्थानिक भाषेत शेतीसाठी सरकारी अनुदानांबाबत माहिती घेण्यासाठी ‘एआय’ आधारित बॉट तंत्रज्ञानाचा वापर केला होता. मला वाटते की तो अगदी सुरुवातीला जीपीटी ३ किंवा २.५ वर तयार केलेला असावा, असे त्यांनी सांगितले.
त्या शेतकऱ्याने केवळ माहितीच मागितली नाही तर त्याच्या वतीने अर्जही पूर्ण भरण्याची विनंती त्याने ‘एआय टूल’ला केली. डिजिटल यंत्रणेपासून पूर्वी दूर राहिलेल्या लोकांना माहिती मिळविण्यासाठी ‘एआय’ कशी मदत करू शकते याचे हे एक उदाहरण असल्याचे नाडेला यांनी नमूद केले. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूईएफ) ते बोलत होते.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूईएफ) ब्लॅकरॉकचे अध्यक्ष आणि सीईओ लॉरेन्स डी. फिंक यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, नाडेला म्हणाले, की ‘एआय’चा जगभर वेगाने प्रसार करणे, हे मोठे आव्हान आहे.