उच्च प्रतीच्या टोमॅटोला शहरांमध्ये व निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. मात्र पाण्याची टंचाई, तणांची वाढ आणि वाढता मजुरी खर्च यामुळे उत्पादन खर्च वाढतो. या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे पॉलीथीन आच्छादन (मल्चिंग पेपर). योग्य पद्धतीने वापर केल्यास उत्पादन वाढते, फळांची गुणवत्ता सुधारते आणि किड‑रोगांचा धोका कमी होतो.

पॉलीथीन आच्छादनाचे फायदे पॉलीथीन आच्छादनामुळे तणांचे नियंत्रण होते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, खतांचा ऱ्हास थांबतो आणि मजुरीचा खर्च घटतो. जमिनीचे तापमान संतुलित राहते, उपयुक्त जिवाणूंची वाढ होते, फळे स्वच्छ व आकर्षक मिळतात आणि किड‑रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे उत्पादन लवकर येते व बाजारभाव चांगला मिळतो.

या पद्धतीत सुरुवातीचा खर्च जास्त येतो. काढणी व आंतरमशागत करताना काळजी घ्यावी लागते. दोन बेडमधील मोकळ्या जमिनीची धूप होऊ शकते आणि उंदीर‑घुशी कागद कुरतडू शकतात. त्यामुळे योग्य देखभाल आवश्यक असते.टोमॅटोसाठी १ मीटर रुंदीचा, चंदेरी रंगाचा आणि २५ ते ३० मायक्रॉन जाडीचा पेपर योग्य ठरतो. साधारण ४०० मीटर लांबीचे रोल उपलब्ध असतात. एकरी सुमारे ५ ते ६ बंडल लागतात.

जमिनीची तयारी माती परीक्षण करून सामू ६ ते ७ दरम्यान ठेवावा. नांगरट करून माती भुसभुशीत करावी. तीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. लागवडीपूर्वी शेणखत, सेंद्रिय खते व आवश्यक रासायनिक खते मिसळावीत. ठिबक सिंचनाची व्यवस्था आधी करणे फायदेशीर ठरते.

https://agrowon.esakal.com/agro-special/polyethylene-mulching-boon-for-production-high-quality-tomatoes-ssp-25

माहिती शेअर करा