अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाल्याने बेदाणा उत्पादन आणि निर्यातीत मोठी घट झाली असल्याचा मुद्दा समाधान अवताडे, रोहित पवार यांच्यासह इतर आमदारांनी विधानसभेत आज (ता.२७) उपस्थित केला. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी चालू वर्षात बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटल्याचे सभागृहात सांगितले. उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मदत व उपाययोजनांसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निर्यातीत तब्बल ८१ टक्यांची घट…
मंत्री रावल यांनी सभागृहात सांगितले की, २०२५-२०२६ आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०२५ पर्यंत बेदाण्याची निर्यात मागील वर्षाच्या ४२ हजार ७१६ टनांवरून केवळ ७ हजार ९२४ टनांपर्यंत खाली आली आहे. यामुळे निर्यातीत तब्बल ८१.४५ टक्के घट झाली आहे. राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख ५० हजार टन बेदाणा उत्पादन होत असताना यंदा ते फक्त १ लाख ५० हजार टनांवर आले आहे.
द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका…
आमदारांनी पुढे बोलताना सांगितले, सांगली जिल्ह्यासह राज्यातील द्राक्ष उत्पादक भागांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. ऑगस्ट २०२५ मध्ये २.१७ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले, तर सप्टेंबर २०२५ मध्ये २० हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावरील बागा पूर्णपणे बाधित झाल्या. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, अहवाल शासनाकडे सादर केला गेला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा काढून टाकल्या असून, भविष्यात बेदाणा उत्पादन आणि निर्यातीवर याचा दीर्घकालीन विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/raisin-exports-drop-81-after-heavy-rain-damage-sai29