बाजार समितीत नव्या हळदीची आवक वाढू लागली असली तरी हळदीला चांगली मागणी आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. सद्यःस्थितीला बाजारात स्थानिक हळदीची आवक सुरू आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत परपेठ म्हणजे इतर जिल्ह्यांतील आवक सुरू होईल, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
बाजारात नव्या हळदीचा हंगाम जानेवारीपासून सुरू झाला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून अंदाजे एक लाख पोत्यांची (एक पोते ५० किलोचे) विक्री झाली असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. हंगामाच्या प्रारंभापासून हळदीला चांगले दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सांगलीसह सातारा जिल्ह्यातील हळद काढणीला गती आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण या भागांत काढणी सुरू झाली असून, सद्यःस्थितीला एकूण क्षेत्राच्या पाच टक्के क्षेत्रावरील हळद काढणी उरकली आहे.
सांगलीच्या बाजार समितीत सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सांगली जिल्ह्यांतील आष्टा, वाळवा, मिरज तालुक्यांच्या पूर्व भागातील शेतकरी बाजारात हळद विक्रीस येऊ लागली आहे. बाजारात दररोज ८ ते १० हजार पोत्यांची आवक होत आहे. कर्नाटकातील हळदही विक्रीस आली आहे. देशांतर्गत बाजारात चांगली मागणी असल्याने उठावही होत आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत.देशात गत वर्षी अतिवृष्टीचा फटका हळद पिकाला बसला होता. त्यामुळे उत्पादन घट होणार हे निश्चित होते.काढणी सुरू झाली असल्याने एकंदर हळदीच्या उत्पादनात अंदाजे १५ टक्क्यांपर्यंत घट झाली असल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने उत्पादन घटण्याची टक्केवारीही वाढेल असेही त्यांनी सांगितले.
https://agrowon.esakal.com/market-intelligence/turmeric-price-stable-market-update-rat16