मार्चच्या सुरुवातीला उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. देशात आणि राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात सकाळी गारवा जाणवत आहे. पण दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाली आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी १२ अंशांची नोंद झाली होती.
इतर भागातील तापमान १५ अंशाच्या पुढे होते. तर कमाल तापमान विदर्भात अधिक जाणवले. अमरावती आणि वर्धा या दोन्ही ठिकाणी ३७ अंशाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातही किमान तापमानात वाढ झाली आहे. आज पंजाबमधील अमृतसर येथे देशातील निचांकी १०.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. तर दक्षिण भारतातील तापमानातही चांगलीच वाढ झालेली आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे देशातील उच्चांकी ३८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यातील तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.
कोकणातील काही भागात बुधवारी आणि गुरुवारी उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी उष्ण दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. तर गुरुवारी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील इतर भागातही कमाल तापमानात वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/north-india-cold-wave-decline-heat-increase-forecast-rat16