रांजणीच्या (ता. कळंब) नॅचरल शुगर कारखान्याने एकाच दिवशी कार्यक्षेत्रातील ७५३ शेतकऱ्यांच्या शेतात कृत्रिम बुद्धिमता (एआय) ऊस उत्पादन वाढीच्या प्रकल्पांचा प्रारंभ केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या अशा प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न केला. यातूनच त्यांनी मंगळवारी (ता. सहा) प्रकल्पांचा अंमलबजावणीचा आढावा घेतला. यात जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाची कास धरल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांचा आणखी सहभाग वाढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ते आधारित तंत्रज्ञानाच्या वापरासाठी धोरणात्मक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या धोरणांतर्गत जिल्ह्यात ऊस पिकाची उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/ai-to-increase-sugarcane-production-abhi47