राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. आज (ता. १६) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (रेड अलर्ट), कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातही समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश, तर अमरावती येथे ४० अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे उच्चांकी २५० मिलिमीटर, सिंधुदुर्गातील कणकवली येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
विदर्भ, गुजरातमध्ये मॉन्सूनची प्रगती शक्य
महाराष्ट्रात यंदा वेगाने दाखल होणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल तब्बल २० दिवस थांबली आहे. २६ मेपर्यंत महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागांत दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची प्रगती झालेली नाही.
वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने आज (ता. १६) विदर्भ, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुढील दोन दिवसांत पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.