सूक्ष्मजीवांचे जग म्हणजे दृष्टीआडची सृष्टी. पिकांचे अन्नचक्र असो की कीड, रोगांचे नियंत्रण यांच्याशिवाय पान हालत नाही. आपले पोट बिघडले, की जसे दही किंवा प्रोबायोटिक खावे लागते तसे जमिनीचे पोट बिघडले की सूक्ष्मजीवांचे विरजण आवश्यक आहे, हे आपल्याला उमगले आहेच. या जीवसृष्टीत कोरम सेन्सिंग नावाच्या तंत्रज्ञानाचा चंचुप्रवेश झाला आहे. तसा याचा शोध जुनाच आहे, पण सध्या त्याचे उपयोग खऱ्या अर्थाने शेतीत उतरताहेत.
आता तुम्ही विचाराल, की पंचायतीच्या मीटिंगमधला कोरम आम्हांला माहितीये, पण सूक्ष्मजीवांचा कोरम म्हणजे काय भानगड आहे बुवा? जिवाणूंच्या मीटिंगमध्ये पण आपल्यासारखी कोरमची पंचायत असते की काय? तर कोरम सेन्सिंग ही जिवाणूंची एक दुसऱ्याशी संवादाची पद्धत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही जिवाणूंची दुसऱ्याला रासायनिक साद घालत ‘संख्या मोजण्याची पद्धत’ आहे. या सूक्ष्मजीवांच्या जगात कोरम सेन्सिंग हे महत्त्वाचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी उलगडले आणि सूक्ष्मजीवांची कुजबूज ही आपल्यापर्यंत पोहोचली.
कोरम सेन्सिंग’चे कार्य जसा एखादा पक्षी दुसऱ्याला साद घालत जवळपास दुसरा पक्षी आहे का हे चाचपून बघतो, तसेच सूक्ष्मजीव जैवरसायनांचा सिग्नल देऊन आपला भाऊबंद जवळपास आहे का? हे तपासून बघतात. याला ‘ऑटोइंड्यूसर’ म्हणतात. आपल्यासारख्या जिवाणूंना वाढण्यास ते मदत करतात. या रासायनिक साद-प्रतिसादाने त्या वातावरणात एकाच प्रकारच्या जिवाणूंची वाढ होते. जेव्हा जिवाणूंची संख्या कमी असते, तेव्हा वातावरणात या साद-प्रतिसादाच्या रसायनाचे प्रमाणही कमी असते, त्यामुळे ते शांत पडून असतात. त्यांचेदेखील आपल्या मीटिंगसारखेच असते. जसा कोरम पूर्ण झाल्याशिवाय आपल्या मीटिंगला अर्थ नसतो, तसाच जिवाणूंचा कोरम झाल्याशिवाय त्यांचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास दुधात योग्य मात्रेत विरजण जर मिसळले नाही तर दही दुधाचे न होता डोक्याचे होईल हे निश्चित. ‘अपना टाइम आयेगा’ असे म्हणत, जिवाणू कोरम सेन्सिंगद्वारे संख्याबळ वाढवत असतात.
https://agrowon.esakal.com/agro-special/quorum-sensing-how-bacteria-communicate-sai29