देशातील कापूस पिकामध्ये सातत्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट आणि लागवड क्षेत्रावर परिणाम झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेत लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेने गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणारे जनुकीय सुधारित तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला आहे.
गुलाबी बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन खर्चात वाढ झाली आहे. यामुळे अन्य पर्यायी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. देशात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र १३० लाख हेक्टरपर्यंत असते. यंदाच्या हंगामात लागवड क्षेत्र ११३ लाख हेक्टरपर्यंत मर्यादित राहील, असा अंदाज आहे. २०२५-२६ या वर्षात हे क्षेत्र सुमारे १०० लाख हेक्टरपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही बाब गांभीर्याने घेत लखनऊ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जनुकीय सुधारित तंत्रज्ञान विकसित केले आहे.
या बाबत माहिती देताना संस्थेतील तज्ज्ञ डॉ. पी. के. सिंग म्हणाले, की या तंत्रज्ञानात वापरण्यात आलेले ‘इंजिनिअर्ड बीटी क्राय प्रोटीन’ हे गुलाबी बोंड अळीसाठी प्रतिकारक्षम असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीजी-२ मध्ये याचा अंतर्भाव करीत चाचणी घेण्यात आली.
याचेही निष्कर्ष सकारात्मक आहेत. सध्या अस्तित्वात असलेले जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा प्रभाव १२० दिवसांपर्यंत राहतो. परंतु भारतीय स्तरावर विकसित गुलाबी बोंड अळी प्रतिकारक जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा प्रभाव कालावधी हा १६० दिवसांपर्यंत आहे. त्यामुळे अधिक कालावधीचे वाण लागवड असलेल्या तेलंगणा राज्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर राहील.
https://agrowon.esakal.com/agro-special/pink-bollworm-resistance-technology-developed-rat16