मराठवाड्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या लातूर जिल्ह्यात यावर्षी अतिपाऊस झाला. याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागांवर झाला असून, ३० टक्के उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेगवेगळ्या फवारण्या करून द्राक्ष बागा जिवंत ठेवण्याचे काम सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी करीत आहेत.
दरवर्षी १५० कंटेनरची निर्यात
जिल्ह्यात दरवर्षी किमान १५० कंटेनर द्राक्षांची निर्यात केली जाते. लातूर जिल्ह्यातील द्राक्षांना परदेशात ६५ रुपयापासून ते ८० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यावर भर दिला जात आहे.
युरोपीय देश चाखतात चव
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष युरोपीय देशात पाठवले जातात. यात प्रामुख्याने नेदरलँड, नॉर्वे, जर्मनी, रोटरडॅम आदी देशांतील नागरिक लातूरच्या द्राक्षांची चव चाखतात. या देशांत द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे.
५०० एकरवर द्राक्ष बागा
लातूर जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन घेण्याऱ्यांची संख्या चांगली आहे. यात औसा तालुक्यात सर्वाधिक द्राक्ष बागा आहेत. त्यापाठोपाठ रेणापूर तालुक्यात द्राक्ष बागा आहेत. सध्या जिल्ह्यात ५०० एकरवर द्राक्ष बागा उभ्या आहेत.